भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलांसाठी विमानतळ टेहळणी करणाऱ्या 11 रडार्सच्या खरेदीचा संरक्षण मंत्रालयाने केला करार

 

नवी दिल्ली : भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलांसाठी विमानतळ टेहळणी करणाऱ्या 11 रडार्सच्या खरेदीचा करार 03 जून 2021 रोजी संरक्षण मंत्रालयाने केला आहे. मुंबईच्या मेसर्स महिन्द्रा टेलेफोनिक्स इंटिग्रेटेड सिस्टम लिमिटेड बरोबर हा करार झाला असून यात मोनोपल्स सेकंडरी सर्विलंस रडारचाही समावेश आहे.

खरेदी आणि निर्माण श्रेणीत 323.47 कोटी रुपयांचा हा करार झाला आहे. हे रडार बसवल्यानंतर आपल्या हवाई क्षेत्राची सतर्कता आणि क्षमता वाढेल तसेच भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या हवाई कारवाईसाठीची सुरक्षा तसेच परिणामकारकता वाढेल.

या करारामुळे आत्मनिर्भर भारतच्या संकल्पनेला बळकटी मिळाली असून या कार्यक्रमाची उद्दीष्ट साकार होण्याच्या दिशेने हे पाऊल आहे. यामुळे तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि स्वदेशी उत्पादने यांना चालना मिळून रोजगाराच्या संधीही वाढतील.