एथेनॉल निर्मितीसाठी पुरवल्या जाणाऱ्या भाताचा दर यंदाही २ हजार रुपये प्रतिक्विंटल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एथेनॉल निर्मितीसाठी अन्न महामंडळाकडून पुरवल्या जाणाऱ्या भाताचा दर चालू आर्थिक वर्षात २ हजार रुपये प्रतिक्विंटल असाच राहणार आहे. इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या एथेनॉलचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने सरकारने आता भात आणि मक्याच्या वापराला परवानगी दिली आहे.

मक्यापासून तयार केलेल्या एथेनॉलचा दर सरकारने ५१ रुपये ५५ पैसे प्रति लीटर एवढा निश्चित केला आहे. तर भातापासून मिळणाऱ्या एथेनॉलचा दर ५६ रुपये ८७ पैसे प्रति लीटर राहील. कृषी अर्थव्यवस्थेचा विकास, आयात इंधनावरचं अवलंबित्व कमी करणं, परदेशी चलनाची बचत आणि प्रदूषणाला आळा घालणं या उद्दिष्टांनी सरकारने पेट्रोल मधे एथेनॉलचं प्रमाण २०२२ सालापर्यंत १० टक्के तर २०२५ पर्यंत २० टक्के करायचं ठरवलं आहे.

साखर उत्पादकांना दिलासा देण्यासाठी उसाचा रस, काकवी आणि मळीपासून एथेनॉल निर्मितीची परवानगी दिली असून अतिरिक्त ऊस कारखान्यांनी एथेनॉलसाठी वापरावा असं सांगितलं आहे.