ज्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे, अशांना दुसरी मात्रा देण्याला प्राधान्य द्यावं - राजेश भूषण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत सद्यस्थितीत ज्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे, अशांना दुसरी मात्रा देण्याला प्राधान्य द्यावं अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातली राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना केली आहे.

यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना मिळणाऱ्या लसींपैकी ७० टक्के लसी दुसऱ्या मात्रेसाठी राखीव ठेवता येतील. उरलेल्या ३० टक्के लसींमधून पहिली मात्रा घेणाऱ्यांना लस देता येईल असं त्यांनी सांगितलं.

राजेश भुषण आणि कोविड लढ्याविरोधातली तंत्रज्ञान आणि माहिती व्यवस्थापनाच्या सक्षम गटाचे अध्यक्ष डॉ आर.एस. शर्मा यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा गेतला त्यावेळी ते बोलत होते.

सद्यस्थितीत लसीची दुसरी मात्रा देण्यासाठी मिळालेल्या लसींचा १०० टक्के साठा राखीव ठेवायचं स्वातंत्र्य राज्य सरकारांना असेल असंही भूषण म्हणाले. केंद्र सरकारकडून होणाऱ्या लस पुरवठ्याबाबत राज्य सरकारांना आगाऊ आणि पारदर्शक पद्धतीनं माहिती दिली जाते.

१५ ते ३१ मे या कालावधीसाठीच्या लस पुरवठ्याबाबत येत्या १४ मे रोजी माहिती दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. लसीची पहिली मात्रा घेतलेल्यांना दुसऱ्या मात्रेसाठी सुलभतेनं नोंदणी करता यावी यादृष्टीनं कोविन पोर्टलमधे लवकरच नव्या वैशिष्ट्यांचा समावेश केला जाणार असल्याचं डॉ. शर्मा यांनी सांगितलं.