चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई तसंच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत काही प्रमाणात नुकसान होऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतला. चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याचा आणि मदत कार्य वेगानं करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

या वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी झाले आहेत. एकूण १२ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये काही नुकसान आणि पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांना वीज पुरवठा खंडित होऊ दिलेला नाही त्याचप्रमाणे पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरु आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.

रस्त्यावर पडलेली झाडे, पडलेले विजेचे खांब तातडीनं काढून तसेच अगदी गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक सुरु राहील याची काळजी घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला  केल्या. मच्छिमारांच्या काही बोटींचे नुकसान झाल्याबाबतही त्यांनी माहिती घेतली.

या चक्रीवादळामुळे  २ हजार ५४२ घरांची अंशत: तर ६ घरांची पूर्ण पडझड झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यात २४, पालघर ४, रायगड १,७८४, रत्नागिरी ६१, सिंधुदुर्ग ५३६, पुणे १०१, कोल्हापूर २७ आणि सातारा जिल्ह्यात सहा घरांची पडझड झाली. रायगड आणि रत्नागिरी इथं प्रत्येकी २ अशी ४ जनावरे मरण पावली आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनाही परिस्थितीवर लक्ष ठेवायला सांगितलं असून कोकण विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्कडून मुख्यमंत्री सातत्यानं माहिती घेत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ कृष्णानंद होसाळीकर यांच्याशीही चर्चा केली.