लहान मुलं आणि नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी पूर्ण तयारी करावी- राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्रासह राज्य सरकारांनी लहान मुलं आणि नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी पूर्ण तयारी करावी असं निर्देश राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं दिले आहेत. यासंदर्भात आयोगाने केंद्रीय आरोग्य सचिवांना पत्र लिहीलं आहे.

या काळात राष्ट्रीय आपत्कालीन परिवहन सेवेचे महत्व लक्षात घेऊन, त्याचे पुनर्गठन करावे, तसंच नवजात बालकं आणि लहान मुलांसाठी रुग्णवाहिकांसह इतर आरोग्यविषयक सेवांच्या सज्जतेसाठी तयारी करायचे निर्देश संबंधितांना द्यावेत असे या पत्रात सूचवले आहे.

नवजात बालकं आणि लहान मुलांमधे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी तसेच त्यांच्या वैद्यकीय उपचार व्यवस्थापनासंबंधी प्रोटोकॉल तयार केले असतील तर त्यासंदर्भातली माहिती सादर करावी असंही या पत्रात म्हटलं आहे.