जहा बीमार वही उपचार प्रधानमंत्री यांचा कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी नवा मंत्र

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जहा बीमार वही उपचार हा कोरोनाविरोधातल्या लढाईचा नवा मंत्र असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. प्रधानमंत्र्यांनी आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसी मधल्या डॉक्टर, निमवैद्यकीय कर्मचारी आणि आघाडीवर राहून काम करत असलेल्या कोरोनायोद्ध्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

कोरोना माहामारीपासून आपल्याला मुलांचं संरक्षण करण्यासोबतच, या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला तयार रहावं लागेल असे ते म्हणाले. कोरोना विषाणू सातत्यानं आपले स्वरुप बदलत आहे, हे लक्षात घेऊन आपल्याला सज्ज रहावे लागेल असे ते म्हणाले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण महत्वाचे असून, लस घेणे ही आपली सामुहिक जबाबदारी आहे, असे सांगत ज्यावेळी आपल्याला लस मिळणार आहे, तेव्हा ती घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.