भगवान बुद्धांच्या शिकवणीतून जगाला खूप काही शिकण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भगवान बुद्धांच्या शिकवणीतून जगाला खूप काही शिकण्याची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज दुरदृष्य प्रणालीद्वारे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या एका आंतरराष्ट्रीय सोहळ्यात बोलत होते. कोव्हिड-19 साथीच्या स्वरूपात जगाला आज मानवी जीवनात अभूतपूर्व संकटाचा सामना करावा लागत असल्याचंही मोदी यांनी यावेळी सांगितलं. या जागतिक साथीविरुद्ध लढा देण्यासाठी अथक परिश्रम घेत असलेल्या आघाडीवरील कामगार, डॉक्टर आणि शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी काम करण्यात आणि बोलण्यात समानता असणारा भारत हा देश असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी हरितगृह वायूंचे दुष्परिणाम कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर मोदी यांनी यावेळी प्रकाश टाकला. आंतरराष्ट्रीय बौद्ध संघ आणि संस्कृती मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जगभरातील सर्व बौद्ध संघाच्या सर्वोच्च प्रमुखांचा सहभाग घेतला.जगभरातील 50 हून अधिक प्रख्यात बौद्ध धार्मिक नेते या संमेलनाला संबोधित करत आहेत. या कार्यक्रमाला सांस्कृतीक मंत्री प्रल्हादसिंग पटेल आणि अल्पसंख्यांक राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील संबोधित केलं.

श्रीलंका आणि नेपाळचे पंतप्रधान आणि मंगोलिया आणि भूतानचे सांस्कृतिक मंत्रीदेखील दूरदृष्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित होते. वेसाक-बुद्धपौर्णिमा हा तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञान आणि महापरिनिर्वाण दिन असा तिहेरी साजरा केला जातो.

दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांची शिकवण आपल्याला दुःखापासून मुक्तीचा मार्ग दाखवत असून बुद्धानी  दाखविलेल्या ज्ञान, करुणा आणि सेवेच्या मार्गाचे अनुसरण करावे आणि सामूहिक संकल्प आणि एकत्रित प्रयत्नांद्वारे कोविडपासून मुक्त व्हावे असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केलं. तर उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी भगवान बुद्धांचा शांती, बंधुत्व आणि करुणा यांचा चिरंतन संदेश जगभरातील मानवतेला प्रेरणा देत आहेत असं सांगत यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.