देशातील कोविड-19 ची परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्राद्वारे सहा सक्षम गटांची पुनःस्थापना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली कोविड-19 ची स्थिती हाताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सहा सक्षम गटांची फेररचना करून केंद्र सरकारनं त्यांचे 10 गट तयार केले आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेली गरज लक्षात घेऊन  अधिक चांगल्या प्रकारे कोविड व्यवस्थापन करण्याच्या उद्देशानं केंद्रानं हा निर्णय घेतला आहे. निती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही.के. पॉल आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा गटाचं आणि 10 सदस्यांच्या समितीचं नेतृत्व करणार आहेत. तर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आपत्कालीन प्रतिसाद सक्षमताविषयक गटाचे निमंत्रक असतील.

हा गट रुग्णालयं, वैद्यकीय उपकरणं आणि औषधांशी संबंधित मुद्द्यांकडे लक्ष देणार आहे. तर ऑक्सिजन उत्पादन, आयात आणि या विषयाशी संबंधित गोष्टींकरिता  रस्ते आणि वाहतूक खात्याचे सचिव गिरिधर अरमाने यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र सक्षम गट तयार  करण्यात आला आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे महासंचालक बलराम भार्गव कोविड चाचण्यासंदर्भातील गटाचे निमंत्रक असतील. तर निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत खासगी क्षेत्र, स्वयंसेवी  आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी निगडीत गटाचं नेतृत्व करतील.