कुंभमेळा प्रतिकात्मक स्वरुपातच व्हावा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर हरीद्वार इथं सुरु असलेला कुंभमेळा प्रतिकात्मक स्वरुपातच व्हावा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज आचार्य महामंडलेश्वर स्वामी अधवेशानंद गिरी यांच्याशी संवाद साधून, कुंभमेळ्याची स्थिती जाणून घेतली.

पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेनंतर स्वामी अधवेशानंद गिरी यांनी लोकांना कुंभमेळ्यात न येण्याचं आणि कोविड प्रतिबंधाचे नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी काल १२ राज्यातल्या ऑक्सिजन पुरवठ्याचा आणि उपलब्ध साठ्याचा आढावा घेतला.

देशात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आणि योग्य प्रमाणात करण्यासाठी केंद्र सरकारची मंत्रालयं आणि विविध राज्य सरकारं यांच्यात समन्वय आवश्यक आहे, असं ते म्हणाले. वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनचं उत्पादन वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

वैद्यकीय वापरासाठीच्या द्रवरूप ऑक्सिजन कंटेनर ट्रकची वाहतूक करण्यास रेल्वे मंत्रालयानं तत्त्वतः मंजुरी दिली आहे. कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानं द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत महाराष्ट्र सरकारनं केलेल्या मागणीनंतर रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे.