निर्बंध लावल्यानंतरच्या काळात वैद्यकीय सुविधा वाढवण्याबाबत तातडीनं कार्यवाही करावी - मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सुविधा वाढवण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते काल राज्याच्या टास्क फोर्सबरोबर आयोजित ऑनलाईन बैठकीत बोलत होते. ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स आणि इतर वैद्यकीय सुचिधा वाढवणं, रेमडीसीव्हीर उपलब्ध करणं, लसीकरण वाढवणं आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याच्या दृष्टीनं तत्काळ कार्यवाही व्हावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

लसीकरण वाढवण्यासाठी राज्याला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण प्रधानमंत्रयांना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे कारण नसतांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असं त्यांचं म्हणणं आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात एसओपी, अर्थात प्रमाण कार्य प्रणाली तयार केली जाईल.

आता आपण लसीकरणात पुढं आहोत. हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी उपयुक्त ठरेल, मात्र आत्ता या क्षणी असलेल्या लाटेला थांबवण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथं ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी, मुंबई पालिकेसारखी वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून बेड्सचं उत्तम व्यवस्थापन करावं, तरुण रुग्णांना देखील व्हेंटीलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे त्याचं नियोजन करावं, एमबीबीएसच्या तृतीय वर्षातल्या विद्यार्थ्याचा, आयुष डॉक्टर्सचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घ्यावा, इत्यादी सूचना या बैठकीत करण्यात आल्या.

Popular posts
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताची ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी
Image
मुंबईत लॉकडाऊनच्या दुसरा दिवशी व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण
Image
आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image
देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
Image
येत्या तीन वर्षात सुमारे ३६ हजार ५०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं लोकसभेत प्रतिपादन
Image