आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचे जलदगतीने सक्षमीकरण करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अधिकारी वर्गाला आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचं जलदगतीनं सक्षमीकरण करण्याचं आवाहन अधिकारी वर्गाला केलं आहे. काल कोविड-१९ संर्दभातल्या सद्यस्थितीबाबत उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत त्यांनी देशातली प्राणवायूची उपलब्धता, १८ ते ४५ वयोगटासाठी लसीकरण, औषध उपलब्धता यांचाही आढावा घेतला. देशातल्या द्रवरुप वैद्यकीय प्राणवायूच्या निर्मितीची क्षमता गेल्या ऑगस्ट महिन्यात ५ हजार ७०० टन प्रतिदिन होती. ती आता ८ हजार ९२२ टन प्रतिदिन इतकी वाढवण्यात आली आहे. आणि या महिन्याअखेरीला ही क्षमता ९ हजार २५० टन प्रतिदिन इतकी होईल, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.