भारतीय उत्पादनांचा दर्जा सुधारणे गरजेचे- प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कारखान्यांमध्ये तयार होणारी उत्पादने जगभर स्वीकारली जातील, इतकी सक्षम करण्यासाठी त्यांचा दर्जा सुधारणे गरजेचं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि नितीआयोगानं उत्पादन आधारित प्रोत्साहनपर लाभ योजनेविषयी आयोजित केलेल्या वेबिनारमधे बोलत होते.

अतिशय उत्तम प्रतीचं तंत्रज्ञान वापरून परवडणारी, आणि टिकाऊ उत्पादने तयार करण्यासाठी सरकार उद्योजकांसोबत काम करत आहे, असं त्यांनी सांगितलं. उत्पादनआधारित प्रोत्साहनपर लाभ योजनेमुळे विविध उद्योगांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी दर्जेदार उत्पादन करण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होईल, असं ते म्हणाले. या योजनेमुळे उद्योगांची निर्यातक्षमता वाढेल, रोजगारनिर्मिती होईल आणि उत्पन्नही सुधारेल. म्हणूनच या योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केली आहे.

आगामी ५ वर्षात ५२० अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांची निर्मिती अपेक्षित आहे, असं ते म्हणाले. उद्योगसुलभता वाढवणे, मजुऱ्यांची संख्या कमी करणे, इतर खर्चात कपात आणि जिल्ह्यांना निर्यात केंद्रं म्हणून तयार करण्यावर मोदी या भाषणात भर दिला.