पहिल्या डावात भारताची इंग्लंडवर १६० धावांची आघाडी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताने आज मजबूत पकड घेतली आहे. पहिल्या डावात इंग्लंडवर १६० धावांची आघाडी मिळवल्यानंतर, दुसऱ्या डावात भारताच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडची फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दुसऱ्या डावात इंग्लंडच्या ८ गडी बाद १११ धावा झाल्या होत्या. आतापर्यंत या डावात अक्षर पटेलने ५ तर आर आश्निनने ३ गडी बाद केले आहेत. 

त्याआधी आज सकाळी भारताने कालच्या ७ गडी बाद २९४ धावांवरून आपला पहिला डाव पुढे सुरू केला.

वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद ९६, तर अक्षर पटेलच्या ४३ धावांमुळे भारताने इंग्लंडवर पहिल्या डावात १६० भावांची मजबूत आघाडी मिळवली.

अक्षर पटेल दुर्दैवाने धावबाद झाल्यानंतर इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज खेळपट्टीवर तग धरू न शकल्याने वॉशिंग्टन सुंदरची कारकीर्दीतले पहिले शतक झळकावण्याची संधी हुकली.