देशातल्या ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लस द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लस द्यायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. येत्या १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होईल असं ते म्हणाले.

या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. देशातील ४५ वर्षांवरच्या नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मागणी ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हीसीद्वारे नुकत्याच झालेल्या बैठकीत केली होती. कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढवणं आवश्यक आहे. त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणं गरजेचं आहे. विशेषतः ४५ वर्षांवरचा तरूण वर्ग कामासाठी बाहेर असतो, त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणं गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं होतं.

ही मागणी मान्य झाल्यानं आता राज्यातल्या लसीकरणाला आणखी गती मिळेल, असं मुख्यंमंत्री सचिवालयाकडून आलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.