'दवाई भी - कडाई भी' हा मंत्र पाळण्याचे प्रधानमंत्री यांचे मन की बात मधून आवाहन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मानवी जीवनाशी निगडित अशा अनेक पैलूंवर विचारमंथन घडवून आणत ‘’मन की बात’’ चा प्रवास सुरू आहे. त्यात मोलाचं सक्रीय योगदान देणार्याग श्रोत्यांशी झालेल्या संवादातून प्रकाशात आलेले जिद्द, संघर्ष, समर्पणाचे दाखले अनेकांसाठी प्रेरणादायी होते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरुन “मन की बात” मधून केलं.“मन की बात” च्या आजच्या ७५ व्या भागात “मन की बात” आवर्जून ऐकणार्यार आणि त्या निमित्तानं होणार्याी विचारमंथनात सहभागी होणार्यार सर्वच श्रोत्यांचे त्यांनी आभार मानले.३ ऑक्टोबर २०१४ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर देशवासियांशी संवाद साधण्यास सुरूवात केली. आज होलिकोत्सवाच्या पर्वावर अमृतमहोत्सवी “मन की बात” होत आहे. “एक दीप से जले दुसरा और राष्ट्र रोशन हो हमारा’’ या भावनेतून ही वाटचाल सुरू आहे असं मोदी म्हणाले.
मार्च महिन्यात “दांडीयात्रा” दिनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू झाला याच महिन्यात अमृतमहोत्सवी “मन की बात” होते आहे हा योगायोग अधोरेखित करून आपापल्या भागातल्या स्वातंत्र्य लढ्यातल्या संघर्षगाथा देशासमोर मांडा असं आवाहन पंतप्रधानांनी आजच्या ‘’मन की बात’’ मधून लोकांना केलं.
जनता कर्फ्यू, टाळी - थाळी वाजवून, दीप उजळून व्यक्त केलेला निर्धार, नंतर वर्षभर महामारीशी दिलेला निकराचा लढा आणि आता यशस्वीपणे राबवली जात असलेली जगातली सगळ्या मोठी कोरोना लसीकरण मोहिम असा सगळा पट त्यांनी उलगडला.मध आणि मेणाची वाढती मागणी लक्षात घेऊन, शेतकर्यां च्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी आता श्वेतक्रांती पाठोपाठ मधुक्रांतीकरता सज्ज होण्याचं आवाहन त्यांनी केलं.
सणासुदीच्या शुभेच्छा देत, निरोगी राहा, आनंदी राहा, उत्साहानं सण साजरे करा असं सांगतानाच, कोरोना संकट अजून टळलेलं नाही याची जाणीव करून देण्यासाठी “दवाई भी कडाई भी” या संदेशाची आठवण करून देत पंतप्रधानांनी आजच्या मन की बात ची सांगता केली.
स्वातंत्र्याच्या 'अमृत महोत्सवानिमित्त काहीतरी नवीन संकल्प करून तो पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु या, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज आकाशवाणी वरुन 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे जनतेशी बोलत होते.
स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी केलेल्या त्याग आणि बलिदानाच्या अमर कहाण्या आपल्याला कर्तव्याच्या मार्गाने जाण्यासाठी प्रेरित करत राहोत. यासाठी एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाच्या संघर्षाची गाथा, एखाद्या जागेचा इतिहास, देशाची एखादी सांस्कृतिक कथा, 'अमृत महोत्सवाच्या’ दरम्यान आपण देशासमोर आणू शकता, असं ते म्हणाले.
कोविड प्रतिंबंधक लस सर्वांनी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. याच महिन्यात महिला दिन झाला. नेमकं याच सुमाराला देशातल्या अनेक महिला क्रीडपटूंनी नवे विक्रम रचले, पदकं जिंकली, मिताली राज ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे १० हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. तिची यशोगाथा सर्वांसाठी प्रेरणादायक असं ते म्हणाले. आयएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सुर्वणपदकं भारतानं जिंकली, पी. व्ही सिंधूनं बी डबल्यू एफ स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं.
एकंदरच शिक्षणापासून उद्योजकतेपर्यंत, सशस्त्र दलांपासून विज्ञान आणि तंत्रज्ञानांपर्यंत सर्व क्षेत्रांमधे देशाच्या कन्या उत्तम कामगिरी करत आहे, असं मोदी म्हणाले. प्रत्येक क्षेत्रात नाविन्य आणि आधुनिकता आवश्यक आहे, भारतीय कृषी क्षेत्रात पारंपारिक शेतीबरोबरच नवे शोध, नव्या पर्यांयाचा स्वीकार करणं, तितकंच महत्त्वाचं आहे. त्यातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढेल, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. मधुमक्षिका पालन हा मोठ्या उत्पन्नाचा चांगाल स्रोत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पर्यंटनाच्या बाबतीत दीपगृहांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. होळी तसंच आगामी गुढीपाडवा, बैसाकी, रामनवमी, ईस्टर इत्यादी सणांसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. १४ एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, हा दिवस आपल्या घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांचं स्मरण करुन देतो, यावेळी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा दिवस आणखी खास बनला आहे. बाबासाहेबांची जयंती आपण संस्मरणीय बनवूया, आपल्या कर्तव्यांचा संकल्प करून त्यांना आदरांजली वाहूया, असं मोदी म्हणाले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.