कोविड प्रतिबंधक लशीच्या ५० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ५० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. लसीकरणाचा हा टप्पा ओलांडणारं, महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. ४३ लाख ४२ हजार लाभार्थ्यांना लशीची पहिली मात्रा दिली असून, ६ लाख ७२ हजार लाभार्थ्यांना दुसरी मात्राही दिली आहे. 

 काल सुमारे २ लाख ७१ हजार नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत एकूण ४३ लाख ८३ हजार नागरिकांचं लसीकरण झालं आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या २२ लाखापेक्षा जास्त आहे. ९ लाख ४० आरोग्य कर्मचाऱ्यांना लशीची पहिली मात्रा दिली आहे, तर साडेचार लाख कर्मचाऱ्यांना दुसरी मात्राही दिल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं.  आघाडीवर काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांपैकी ७ लाख १४ हजार कर्माचाऱ्यांचं लसीकरण झालं आहे, त्यापैकी २ लाख १४ हजार कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा मिळाली आहे. ४५ वर्षांवरच्या, सहव्याधी असलेल्या  ५ लाखापेक्षा जास्त नागरिकांचंही लसीकरण झालं आहे.

मुंबईत ९ लाख ७५ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. मुंबईत दररोज सुमारे ४५ हजार लोकांचं लसीकरण होत आहे. मेअखेरपर्यंत ८ लाखापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं तयारी केली आहे.