भारतानं कोरोना साथीविरुद्धच्या लढाईत खूप मोठं यश प्राप्त केलं - पंतप्रधान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं कोरोना साथीविरुद्धच्या लढाईत खूप मोठं यश प्राप्त केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला आज उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतानं जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे.

अलिकडच्या काही महिन्यात भारताची जगाचं औषधालय अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. कोरोनाच्या कठीण काळात देशानं आपली एकजूट दाखवून दिली. असंही ते म्हणाले. 

जग आज अनेक आव्हानांचा सामना करत आहे. या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रपतींचं अभिभाषण आत्मनिर्भर भारताची वाट दाखवणारं, नवा आत्मविश्र्वास दर्शवणारं होतं, असं ते म्हणाले. संपूर्ण जग भारताकडे आशेनं पाहात आहे, भारताकडून जगाला बऱ्याच अपेक्षा आहेत, असं सांगून भारतानं कोरोना काळात जगातील अनेक देशांना औषधपुरवठा केला, तसंच आता लस निर्मिती करून त्यांचाही पुरवठा करत आहे, हे अधोरेखित करत मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेल्या मदतीमुळे भारताकडे कौतुकानं बघितलं जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीतून वाट काढत देशाची अर्थव्यवस्था आता सावरत आहे. देशात विक्रमी गुंतवणूक होत असून भारत दोन अंकी विकास दर साध्य करेल असेही अंदाज व्यक्त केले जात आहेत देशात दर महिन्याला सरासरी चार लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार होत आहेत. असंही त्यांनी सांगितलं.

कोरोना काळात सीमेवर निर्माण झालेला तणाव, सध्या सुरू असलेलं शेतकरी आंदोलन या मुद्द्यांचाही त्यांनी सविस्तर ऊहापोह केला. संसदेत शेतकरी आंदोलनावर चर्चा झाली, पण आंदोलन का केलं हे मात्र सांगितलं नाही असं म्हणतानाच आपल्या कृषी क्षेत्रात काही समस्या आहेत, पण त्यावर सर्वांनी मिळून तोडगा काढणं आवश्यक आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेसोबतच अर्थसंकल्पावरही चर्चा होणार असल्याची आजच्या दिवसाच्या कार्यक्रमपत्रिकेत नोंद आहे.