दिव्यांगासाठीच्या विविध उपक्रमांचा लाभ गेल्या ६ वर्षात १९ लाख व्यक्तींना मिळाला - थावर चांद गेहलोत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या, दिव्यांगासाठीच्या विविध उपक्रमांचा लाभ गेल्या ६ वर्षात सुमारे १९ लाख व्यक्तींना मिळाला आहे. या व्यक्तींना आतापर्यंत १ हजार १०० कोटी रुपयांहून अधिकची उपकरणं दिली असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावर चांद गेहलोत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत बांद्रा इथं दिव्यांगांसाठीच्या अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिएसबिलिटीमध्ये वसतीगृहाच्या इमारतीची पायाभरणी करताना बोलत होते. 

पहिल्या टप्प्यात या इमारतीमध्ये चार मजले उभारले जाणार असून त्यात ३० खोल्यांमध्ये ६० विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होईल. पुढच्या वर्षीपर्यंत ही इमारत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. दुसऱ्या टप्प्यात ही इमारत एकूण ८ मजली करण्याचे नियोजन असून सुमारे १४० विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. यावेळी स्थानिक आमदार आशिष शेलार, संस्थेच्या संचालिका डॉ. सुनी मॅथ्यू तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.