तिसऱ्या टप्प्यापासून ५० वर्षाहून अधिक वयोगटातील ज्येष्ठ व्यक्तींना लसीकरण केले जाणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : तिसऱ्या टप्प्यात केल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या खर्चाविषयी येत्या १० दिवसात धोरणात्मक निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्य लसीकरण कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या दोन टप्प्यातील लसीकरणाचा पूर्ण खर्च केंद्र सरकारतर्फे करण्यात येत आहे, मात्र तिसऱ्या टप्प्यापासून ५० वर्षाहून अधिक वयोगटातील ज्येष्ठ व्यक्तींना लसीकरण केले जाणार असून या लसीकरणाचा खर्च नेमका कोण करणार याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना येत्या १० दिवसात येण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या सहभागातून हा खर्च केला जावा अशी सूचना पुढे आली असली तरी त्याबद्दलचा अंतिम निर्णय अद्यापपर्यंत झाला नसल्याचे स्पष्टीकरण नीती आयोगाकडूनही देण्यात आले आहे.

तिसऱ्या टप्प्यात देशभरातील एकंदर २७ कोटी लोकांना लस देण्याची योजना असून पुढील महिन्यापासून त्याला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. सोलापूर शहरात आतापर्यत ४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर आणि उपायुक्त धनराज पांडे यांनी काल कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली.

शहरात आतापर्यंत ४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. आज १० हजार जणांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती शिवशंकर यांनी दिली आहे.

शहरात एकंदर २२ ठिकाणी लस देण्याची सोय करण्यात आली असून आरोग्य कर्मचारी तसच पोलीस, रेल्वे आदी क्षेत्रातील आघाडीवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.