संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची सांगता

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची काल सांगता झाली. राज्यसभा आधीच संस्थगित झाली होती. काल लोकसभाही अर्थसंकल्पावरील चर्चेनंतर संस्थगित झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र ८ मार्च पासून सुरू होणार आहे.

आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प हा प्रत्येक नागरिकाची महत्वाकांक्षा पूर्ण करणारा असून, भारताला आत्मनिर्भरतेकडे नेणारा आहे, असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सकाळी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना केलं. सरकारनं देशासमोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांचं संधीत रुपांतर केलं, आणि अर्थव्यवस्थेच्या शाश्वत विकासासाठी पावलं उचलली.

त्यामुळे येणाऱ्या काळात भारत जगातील एक आघाडीची अर्थव्यवस्था म्हणून नावारूपास येईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी  व्यक्त केला. या देशातील युवक आणि उद्योजकांवर आपला विश्वास आहे; अधिक दर्जेदार आरोग्यविषयक सुविधांच्या निर्मितीसाठी सरकार प्रयत्नशील असून, देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सरकार कटिबद्ध आहे, असंही अर्थमंत्री म्हणाल्या.