नागपूरमधली फेज ३ ची मेट्रो अमरावती रोडला जोडण्याची केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांची घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नागपूरमधली फेज ३ ची मेट्रो अमरावती रोडला जोडेल, अशी घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी केली आहे. नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर विमानतळ ते चिंचभवन दरम्यान बांधलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचं लोकार्पण काल गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय रस्ते निधीतून ११४ कोटी रुपयांच्या तरतूदीनं रहाटे कॉलनी ते खापरी उडाणपूलापर्यंत ‘ व्हाईट टॉपिंग ‘ ची सुधारणा, खापरी रेल्वे उड्डाण पूल ते मनीषनगर लेवल क्रॉसिंगपर्यंत क्रॉक्रीट रोड, आणि शुक्रवार तलाव ते अशोक चौक या सिमेंट क्रॉक्रिट रस्त्याच्या कामाचं भूमीपूजनही गडकरी यांच्या हस्ते झाले.

यावेळी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस, माजी खासदार दत्ता मेघे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल उपस्थित होते.रेल्वेमुळे प्रलंबित असलेल्या ८१ उड्डाण पुलांबाबतही आपण बैठक घेणार असून वर्ध्याच्या रेल्वे उड्डाण पुलाचं काम मार्गी लागेल अशी ग्वाही गडकरी यांनी यावेळी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख यावेळी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमांतून उपस्थित होते. नागपूर ते काटोल हा चार पदरी रस्ता लवकर व्हावा यासाठी केंद्रीय महामार्ग मंत्रालयानं प्रयत्न करावेत, अशी विनंती त्यांनी गडकरी यांना केली. त्यावर या रस्त्याच्या बांधकामासाठी वन खात्याच्या परवानगीची आवश्यकता असून मिळाली तर या रस्त्याचं काम त्वरित सुरू केलं जाईल, असं आश्वासन गडकरी यांनी दिलं.