घोडाझरी शाखा कालव्याच्या कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
• महेश आनंदा लोंढे
मुंबई :- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड – ब्रम्हपुरी रस्त्यावरील गोसेखुर्द प्रकल्पातील घोडाझरी शाखा कालवा येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालव्याच्या चालू असलेल्या कामाला भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
प्रकल्पाची किंमत कोणत्याही परिस्थितीत वाढणार नाही आणि कामे वेळेत पूर्ण होईल याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता वेमुल कोंडा यांनी मुख्यमंत्र्यांना घोडाझरी शाखा कालव्याविषयी माहिती दिली.
घोडाझरी शाखा कालवा हा गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा घटक आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या ३६.७६ किमी वरून घोडाझरी शाखा कालवा उगमीत असून एकूण लांबी ५५ किमी आहे. घोडाझरी शाखा कालव्याच्या लाभ क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ५ तालुके (ब्रह्मपुरी, नागभीड सिंदेवाही, मुल व सावली) येतात. यातील १९ गावात २९ हजार ६१ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण होणाऱ्या काही कामांमुळे ९ हजार हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ होणार आहे. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता असून निधी लवकर मिळाल्यास डिसेंबर २०२३ पर्यंत या शाखा कालव्याचे काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती वेमुल कोंडा यांनी दिली.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, अप्पर मुख्य सचिव विजय कुमार गौतम, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता वेमुल कोंडा, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री कपोले, गोसेखुर्द प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता अ.का देसाई, घोडाझरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पु. म. फाळके, अधीक्षक अभियंता काटपल्लीवार उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.