राज्यातले ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्या कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबवली जाणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्या राज्यातले ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबवली जाणार आहे. प्रत्येक जिल्हयांमध्ये ३ आरोग्य संस्था आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये एका आरोग्य संस्थेत ड्राय रन घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

याआधी.२ जानेवारीला पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या जिल्हयांमनधे तसंच नागपूर आणि पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात ही मोहिम राबवली होती. क्षेत्रिय स्तरावर कोवीन अॅप किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणं, कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसंच अहवाल तयार करणं, या सर्व बाबींची पडताळणी/तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हानं आणि त्यानुसार मार्गदर्शक सुचना तयार करणं, लसीकरण मोहिमेतले सर्व स्तरावरचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणं, यासाठी ड्रायरन घेतला जात आहे.

या मोहिमेची पूर्वतयारी आज करण्यात असून प्रशासन सज्ज आहे. यासंदर्भात काल व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणही देण्यात आलं आहे. या ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचं निरीक्षण करून एका केंद्रावर २५ लाभार्थ्यांचं लसीकरण केलं जाईल.

लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अॅपवरच्या नोंदणी नुसार कक्षात सोडलं जाईल. त्यानंतर लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोवीन ॲपमध्ये केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.