कोरोनावरील लसीकरणात इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये एका दिवसात उच्चांक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात मोठ्या कोविड -१९ च्या लसीकरण मोहिमेच्या दुसर्याख दिवशी काल ६ राज्यात १७,०७२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

आंध्र प्रदेशात ३०८, तामिळनाडूत १६५, कर्नाटकात ६४, अरुणाचल प्रदेशात १४ आणि केरळ आणि मणीपूर येथे प्रत्येकी एक अशा एकूण ५५३ सत्रात ही लस देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कळवले आहे. यामुळे गेल्या २ दिवसात एकूण २,२४,३०१ लाभार्थ्यांना लस मिळाली आहे.

कालच्या एकाच दिवसात २,०७,२२९ लाभार्थ्यांना लस देण्यात आल्यामुळे यूके, फ्रांस आणि अमेरिकेपेक्षाही एकाच दिवसातील लसीकरणातली ही संख्या सर्वाधिक असल्याचे अतिरिक्त आरोग्य सचिव डॉक्टर मनोहर अगनानी यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले.

या २ दिवसांत लस दिल्यावर केवळ ४४७ जणांमध्ये ताप, मळमळ किंवा डोके दुखणे असे प्रतिकूल परिणाम दिसून आले आणि यातल्या केवळ ३ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. २ रुग्णांना २४ तासांच्या आतच घरी सोडण्यात आले तर १ रुग्ण रुग्णालयात देखरेखीखाली असून त्याची प्रकृती चांगली आहे, असे डॉक्टर अगनानी यांनी सांगितले.

लसीकरणानंतरचे असे प्रतिकूल परिणाम म्हणजे अनपेक्षित वैद्यकीय घटना असून त्याचा लसीकरण मोहिमेशी थेट संबंध जोडता येईलच असे नाही, असे ते म्हणाले.

लसीकरण प्रगतीचा आढावा, त्यात येणारे अडसर आणि त्यावर सुधारात्मक कृती योजनांसंदर्भात काल सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसमवेत बैठकही आयोजित करण्यात आली होती.