सुधारित कृषी कायदे स्थगितीचा सरकारचा प्रस्ताव कायम - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित कृषी कायदे दीड वर्ष स्थगित करण्याबाबत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेला प्रस्ताव अजूनही कायम असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते.

कृषी कायद्यांसंदर्भात आंदोलकांशी चर्चेचे सर्व पर्याय खुले आहेत, त्यासाठी आंदोलकांनी कृषी मंत्र्यांना फक्त एक फोन करणे आवश्यक असल्याचे, प्रधानमंत्री म्हणाले.

प्रजासत्ताक दिनी झालेल्या दुर्दैवी घटनांबाबत कायदा आपले काम करेल, असे प्रधानमंत्रींनी नमूद केले.

विविध पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर सदनात चर्चेला सरकार तयार आहे, मात्र त्यासाठी सदनाचे कामकाज सुरळीत चालण्याची आवश्यकता प्रधानमंत्रींनी व्यक्त केली.

सदनाच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आल्याने, छोट्या पक्षांना आपली मते मांडता येत नसल्याकडे त्यांनी या बैठकीत लक्ष वेधले.

गांधीजींची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने सर्वांनी मार्गक्रमण करण्याचे आवाहन प्रधानमंत्रींनी यावेळी केले.