राज्य पोलीस दलासाठी १ लाख घरे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेणार- गृहमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य पोलीस दलासाठी एक लाख घरे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल नागपुरात केली.

नागपुरातले पोलीस महासंचालक कार्यालय आणि पाचपावली तसेच इंदोरा इथल्या पोलीस अंमलदारांच्या निवासस्थानाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत होते. यावेळी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पोलिसांसाठीच्या घरांची कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण संस्थेनं ३ वेगवेगळ्या पद्धतीचे प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केले आहेत,असे देशमुख यांनी सांगितलं.राज्य पोलीस दल कारागृह पर्यटन सुरु करत असून,त्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी येरवडा कारागृहातून होणार आहे.

स्वातंत्र्य सैनिकांना जिथं ठेवलं होतं त्या खोल्या,महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेला पुणे करार, चाफेकर बंधूंना फासावर चढवण्यात आलेला यॉर्डही पर्यटकांना पाहता येणार आहेत.पुण्यानंतर रत्नागिरी, नाशिक, धुळे आदी तुरुंगांमध्येही पर्यटन सुरु केलं जाणार आहे.