कोविड १९ लसीकरणासाठी आज देशभरात ड्राय रनची दुसरी फेरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ लसीकरणासाठी आज देशभरात ड्राय रनची दुसरी फेरी झाली. राज्यातही मुंबई, पुण्यासाह ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रात ड्रायरनचं आयोजन केलं होतं. राज्यभरात ड्राय रन साठी निवडलेल्या प्रत्येक केंद्रांमधे लाभार्थ्यांची कोरोनाच्यादृष्टीनं सुरक्षाविषक तपासणी आणि निर्जंतुकीकरण केलं गेलं.

ठाणे जिल्ह्यात १२ केंद्रांवर लसीकरणाची ड्राय रन झाली. यात जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे,उपजिल्हा रुग्णालय, शहापुर प्राथमिक आरोग्य केंद्र, दिवा अंजुर प्राथमिक आरोग्य केंद्र, ठाणे आणि भिवंडी निजामपुर महानगरपालिका हद्दीतली दोन केंद्र, याशिवाय कल्याण डोंबिवली, नवीमुंबई, उल्हासनगर आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातल्या प्रत्येकी एका केंद्राचा समावेश होता.

सांगली जिल्ह्यात सांगली महापालिकेच्या वतीनं कोविड लसीकरणाची ड्रायरन झाली. हनुमाननगर इथल्या आरोग्य केंद्रात ही ड्रायरन झाली. यासाठी २५ जणांची नोंदणी केली होती. जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हीलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत खरनारे हे सुद्धा या ड्रायरनमधे सहभागी झाले होते.

अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉक्टर राजेन्द्र भोसले यांच्या नेतृत्वात ड्राय रन यशस्वीरित्या झाली. महानगरपालिकेच्या तोफखाना नागरी आरोग्य केंद्र, तसंच वाळकी इथल्या आरोग्य केंद्रात ही ड्रायरन झाली.