भंडारा जिल्हा रुग्णालय जळीत प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भंडारा जिल्हा रुग्णालयातल्या शिशू विभागाला लागलेल्या आगीच्या दुर्घटने प्रकरणी भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करण्यात आलं आहे.

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची अकार्यकारी पदावर बदली, शीशू विभाग प्रमुख तसेच परिसेविका यांच्यावर निलंबनाची कारवाई आणि २ अधिपरिसेविका आणि १ बालरोगतज्ज्ञ यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वार्ताहरांना दिली.

या दुर्घटनेसाठी गठीत केलेल्यी चौकशी समितीनं  आपला अहवाल काल राज्य सरकारला सादर केला. त्या शिफारशींनुसार कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी राज्य सरकारनं ही कारवाई केली आहे.  दरम्यान या दुर्घटनेचा बोध घेऊन राज्य शासनानं राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांचे १५ दिवसात हेल्थ ऑडीट केलं जाणार आहे.

त्यासाठी आरोग्य आयुक्त डॉ.रामास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर कृती आराखडा तयार करण्यात येईल,असंही टोपे यांनी सांगितलं. जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून आरोग्यसंस्थांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सर्व पालकमंत्र्यांना पत्र देण्यात आल्याचंही ते म्हणाले.