परदेशातून येणाऱ्या विमानप्रवाशांना, ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : परदेशातून अन्य राज्यात उतरून, तिथून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता, अशा प्रवाशांना, ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थानी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी  यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठवले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून असे निदर्शनास आले, की इतर राज्यातल्या विमानतळांवर उतरून प्रवाशी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यांचा मागोवा काढणे शक्य होत नाही. केंद्र सरकारने अशा परदेश प्रवास करून आलेल्यांना त्या-त्या विमानतळांवरून क्वारंटाईन करावे.

ब्रिटनमधून परतलेल्या, राज्यातल्या ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, लसीकरणानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाले तर त्यावर उपचाराची पूर्वतयारी ठेवा. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी टास्क फोर्ससारखी यंत्रणा तयार करावी. आरोग्य संस्थांमध्येच लसीकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.