भूजल पातळी वाढविण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

  भूजल पातळी वाढविण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई : राज्यातील भूजल पातळी वाढविण्यासाठी जनतेचा आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या ‘भूजल वार्ता’ या ई-बुलेटीनचे  प्रकाशन मंत्रालयात पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते झाले.

‘भूजल वार्ता’ या प्रकाशनामुळे भुजलाविषयी विविध भागधारक व लोकांपर्यंत व्यापक स्वरूपात माहिती पोहोचेल तसेच जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल, असा विश्वास पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, पाणीपुरवठा विभागाचे सहसचिव अभय महाजन व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

‘भूजल वार्ता’ या बुलेटिन मध्ये यशोगाथा, विविध योजना, भूजल क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी, माहिती, भूजल यंत्रणेच्या महत्त्वाच्या घडामोडी व कामकाजाची माहिती यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ‘भूजल वार्ता’ हे ई- बुलेटीन स्वरूपात असल्याने यंत्रणेच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आलेले आहे.

भूजलाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि राज्यातील भूजलाचा विचार करताना प्रामुख्याने कठीण पाषाण स्तराचा विचार करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर राज्यातील पर्जन्यमानाची दोलायमानता, वाढती लोकसंख्या, नगदी पिकांकडे असलेला कल आणि भूजल प्रदूषण यासारख्या आव्हानांनाही सामोरे जायचे आहे. भूजल ही एक अदृश्य नैसर्गिक संपत्ती असल्याने भूजलाविषयी अधिक जनजागृतीची आवश्यकता आहे. यादृष्टीने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून ‘भूजल वार्ता’ हा उपक्रम यंत्रणेने सुरू केला. भूजलाविषयी जनजागृती करणे हा यामागील मुख्य उद्देश असून अनेक अभ्यासक आणि संशोधक यांनाही ही माहिती उपयुक्त ठरेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image