वैद्यकीय मनुष्यबळ आणि आधुनिक उपकरणांसाठी सीएसआर फंडातून प्रयत्न करु : आमदार महेश लांडगे
• महेश आनंदा लोंढे
डॉ. ढोबळे यांच्या अनुभवाचा लाभ शहरवासियांना होईल.....आमदार महेश लांडगे
भोसरी इंद्रायणीनगर येथे डॉ. विजय फ्रि मेडीकल क्लिनिकचे उद्घाटन
पिंपरी : वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ आणि अत्याधुनिक उपकरणांचा तुटवडा दूर करण्यासाठी पिंपरी चिंचवड उद्योगनगरीतील दानशूर व्यक्ती, संस्थांनी एकत्र येऊन निधी संकलीत करावा. यासाठी सीएसआर फंडातून निधी मिळविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले.
भोसरी इंद्रायणीनगर येथे आ. महेश लांडगे यांच्या हस्ते ‘डॉ. विजय फ्रि मेडीकल क्लिनिक ॲण्ड फ्रि नर्सिग क्लासेस’ चे उद्घाटन शनिवारी झाले. यावेळी डॉ. बी. डी. महाजन, हभप विठ्ठल महाराज गव्हाणे, डॉ. रोहीदास आल्हाट, डॉ. माधुरी आल्हाट, डॉ. ज्योती ढोबळे, गणेश कवठेकर, डॉ. स्वाती ढोबळे, डॉ. अनुपमा ढोबळे, डॉ. अंजली ढोबळे, डॉ. मंगेश कोहले, युवा नेते योगेश लोंढे, डॉ.विनय ढोबळे आदी उपस्थित होते.
आ. महेश लांडगे म्हणाले की, कोरोना महामारीचा सामना करीत असताना वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाचा तुटवडा प्रकर्षाने जाणवला. मुंबईत तर केरळ मधून परिचारीकांना पाचारण करण्यात आले. पुणे आणि पिंपरीतील जम्बो रुग्णालय प्रशिक्षित मनुष्यबळा अभावी उशिरा सुरु झाले. याचा रुग्णसेवेवर परिणाम झाला. शहरात वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी डॉ. विजय ढोबळे यांच्या फ्रि नर्सिग क्लासेसचा निश्चितच उपयोग होईल. डॉ. विजय ढोबळे यांनी अनेक प्रगत देशात रुग्णसेवा केली आहे. त्यांच्या कुटूंबात सहा डॉक्टर आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा पिंपरी चिंचवड मधिल गोर गरीब रुग्णांना होईल असा आशावाद आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.
यावेळी आळंदीतील ब्रम्ह विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हभप विठ्ठल महाराज गव्हाणे म्हणाले की, आपल्या वाट्याला आलेली रुग्णसेवा हे पवित्र कर्म समजून सर्व डॉक्टरांनी रुग्णसेवा करावी. प्रत्येक रुग्ण हा भगवंताचा, परमात्म्याचा अंश आहे. पुत्रा प्रमाणेच रुग्णावर प्रेम करुन त्याची सेवा केल्यास परमात्म्याची, पांडूरंगाची सेवा केल्याचे समाधान मिळेल. डॉ. विजय ढोबळे आणि त्यांचा परिवार याच भावनेतून रुग्णसेवा करणार आहेत. त्यांच्या सेवाभावी कार्याला भोसरीतून व्यापक स्वरुप मिळेल असे हभप गव्हाणे म्हणाले.
प्रास्ताविक करताना संचालक डॉ. विजय ढोबळे यांनी सांगितले की, या क्लिनिक मध्ये दहावी, बारावी पास झालेल्या गरीब कुटूंबातील मुलींना सहा महिण्याचे परिचारीका प्रमाणपत्र कोर्स पुर्ण मोफत शिकविण्यात येईल. येथे येणा-या गरीब रुग्णांना मोफत तज्ञ डॉक्टरांचे कन्सल्टिंग, औषधे, पॅथॉलॉजी लॅबची व सोनोग्राफीची अल्प दरात सुविधा देणार आहोत. येथे डॉ. विजय ढोबळे (बालरोग तज्ञ), डॉ. ज्योती आणि अनुपमा ढोबळे (स्त्री रोग तज्ञ), डॉ. स्वाती ढोबळे (ह्रदय रोग तज्ञ) आणि डॉ. मंगेश कोहले (पॅथॉलॉजी) हे रुग्ण सेवा करणार आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.