सीएसआर निधितून ‘कोविड-१९’ विरुद्धच्या लढाईसाठी केलेल्या कामांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विविध खासगी बँकांनी सामाजिक बांधिलकी राखत त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी, अर्थात सीएसआर निधितून ‘कोविड-१९’ विरुद्धच्या लढाईसाठी केलेल्या कामांचं उद्घाटन तसंच विविध उपकरणांचं लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल मुंबईत झालं.

कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत सामाजिक बांधिलकी राखत समाजातल्या सर्वस्तरातील व्यक्ती आणि संस्थांनी मदतीचा हात देण्याचं आवाहन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत एचडीएफसी, बंधन बॅंक, ॲक्सिस बॅंक या बँकांनी आपल्या ‘सीएसआर’ निधीचा मोठा वाटा ‘कोविड-१९’च्या लढ्यासाठी उपलब्ध करुन दिला.

विधान भवनाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आमदार चेतन तुपे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, आदी अधिकारी उपस्थित होते.