महानगरपालिका व निगडी पोलिस स्टेशन विरुद्ध, 'लढा यूथ मूव्हमेंट'च्या वतीने बोंबाबोंब आंदोलन
• महेश आनंदा लोंढे
निगडी : सेक्टर नंबर २२ निगडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी महानगरपालिका व निगडी पोलिस स्टेशन विरुद्ध, 'लढा यूथ मूव्हमेंट'च्या वतीने प्रमोद क्षिरसागर यांच्या नेतृत्वात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
मागील काही वर्षात सेक्टर नंबर २२ मधील काही प्रश्न वेळोवेळी मागण्या करूनही प्रलंबित राहिले आहेत. स्थानिक नगरसेवक हे परिसरात राहत नसल्याने व येत्या निवडणुकीची वार्ड रचना लक्षात घेऊन सोईस्कर रित्या आपल्याच परिसरात काम करण्यात मग्न राहिले असल्याने, से नं २२ च्या नागरिकांना मूलभूत सुविधांपासूनच वंचित राहावे लागत आहे. निवडणूक काळात मोठ मोठी स्वप्ने दाखवून तोंडाला पाने पुसण्याचे काम स्थानिक लोक प्रतिनिधीनी केले आहे.
सदर आंदोलनात लढा यूथ मूव्हमेंटचे प्रमोद क्षिरसागर म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून सेक्टर नंबर २२ च्या परिसरात गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षनीय वाढ झालेली आहे. एकाच महिन्यात दोन वेळा अंदाधुंद गोळीबारीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे भागातील नागरिक प्रचंड भयभीत व दहशतीत राहत आहेत. एकतर स्वतंत्र पोलिस चौकी सुरू करा, अन्यथा या भागातील सर्व नागरिकांना बुलेटप्रूफ जॅकेट वाटप करा."
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत प्रवेशद्वाराचे काम गेले ३ वर्षापासुन रखडले आहे. संग्राम नगर झोपडपट्टीमधील स्वच्छतागृहाचा व कॉंक्रीटीकरणाचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. अंकुश चौक या ठिकाणाचे सिग्नल गेले काही दिवसापासून बंद पडले आहेत, ते पुन्हा पूर्ववत व्हावेत. तसेच आझाद चौक या ठिकाणी असलेल्या मनपाच्या माता रमाई सावित्री हॉस्पिटल मध्ये २४ तास तातडीची सेवा सुरू करून, त्याठिकाणी वाढीव सुविधा मिळाव्यात यासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी 'लढा यूथ मूव्हमेंट'चे अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर, भैय्यासाहेब ठोकळ, अमित गोरे, बुद्धभूषण अहिरे, मेघा आठवले, संदीप माने, राकेश माने, आप्पा कांबळे, बापू कांबळे, सिद्धार्थ मोरे, राष्ट्रतेज सवई, आकाश कांबळे, गौतम कांबळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.