भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय निवडणूक आयोगानं मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. याअंतर्गत मुंबईसाठी येत्या १७ नोव्हेंबर पासून १५ ‍डिसेंबर २०२० पर्यंत हरकती आणि दावे स्वीकारले जाणार आहेत.

१ जानेवारी २०२१ पर्यंत जे वयाची १८ वर्ष पूर्ण करतील, तसंच ज्यांची अजूनही मतदार म्हणून नोंदणी झाली नाही अशांनी आपल्या नावाचा मतदार यादीत समावेश करावा यासाठी अर्ज क्रमांक ६ भरून द्यायचा आहे.

मयत तसंच स्थलांतरीत मतदारांचा शोध घेऊन, त्यांचं नाव मतदार यादीतून कमी करायची कामही या कार्यक्रमाअंतर्गत होणार आहेत. त्यासाठी अर्ज क्रमांक ७ भरून द्यावा लागेल. मतदार यादीत नाव, वय, लिंग या बाबतीत झालेल्या चुकीच्या नोंदींच्या दुरुस्तीसाठी अर्ज क्रमांक ८ भरून द्यावा लागणार आहे.

हे सगळे अर्ज www.nvsp.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं भरता येतील तसंच अधिक माहितीसाठी १९५० या टोल फ्री क्रमांकाचा वापर करता अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी दिली आहे.