मार्गदर्शक तत्वं निश्चित झाल्यानंतरचं राज्यातली हॉटेल, रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्याचे मुख्यमंत्र्याचे सुतोवाच


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं. राज्यातल्या औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर इथल्या रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर आज ठाकरे यांनी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.

८० टक्के बाधित लोकांमध्ये लक्षणं दिसून येत नसली तरी त्यांच्याकडून विषाणुचा प्रसार होऊ शकतो, हे लक्षात घेऊन रेस्टॉरंट पुन्हा सुरु करताना यासंदर्भातल्या प्रमाण नियमावलीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता आणि शारीरिक अंतर पाळणे गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच सर्वांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वं अंतिम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन मार्गदर्शक तत्वं निश्चित करण्यात येतील असं अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यावेळी सांगितलं. हाँटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या आहार संघटनेचे शिवानंद शेट्टी, NRAR संघटनेचे अनुराग कटरियार, गुलबक्षसिंह कोहली, महाराष्ट्र हॉटेल फेडरेशनचे सतीश शेट्टी आदी या बैठकीला उपस्थित होते.