राज्यात प्रदेश भाजपातर्फे आत्मनिर्भर भारत संवाद अभियान सुरु


मुंबई (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार समाजाच्या प्रत्येक थरातल्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र भाजपाच्या वतीनं आज राज्यात आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाला सुरुवात झाली.

या अभियानाला फडनवीस यांनी संबोधित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेमुळे येत्या काळात केवळ देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्याला अनेक महत्वाचे बदल झाल्याचं दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोरोनामुळे उत्पादनाशी संबंधित अनेक कंपन्या चीन सोडून जात आहेत, ही भारतासाठी मोठी संधी असून, आपण त्याच्या लाभ घ्यायला हवा, असं ते म्हणाले. यादृष्टीनं केंद्र सरकारनं लघु उद्योग, कृषी क्षेत्र आणि कामगारांसाठी अनेक धोरणात्मक निर्णय आणि कायदे केले असल्याचं सांगून, त्याविषयीची माहितीही फडनवीस यांनी दिली.