सणांच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेकडे प्राधान्यानं - उद्धव ठाकरे


मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी नवरात्र महोत्सव, दसरा, दिवाळी यासारख्या सणांच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेकडे प्राधान्यानं लक्ष देण्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या कोविड 19 स्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

टाळेबंदी उठवण्याच्या टप्प्यात मंदीरं आणि इतर धार्मिक स्थळं उघडण्याची मागणी होत असली तरीही राज्य सरकार खबरदारी बाळगत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. भारतीय जनता पक्षासह इतर विरोधी पक्षांकडून धार्मिक स्थळं उघडण्याची मागणी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही बाब स्पष्ट केली.

सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, अधिकाऱ्यांनी मुंबई - ठाण्यासह या जिल्ह्यांकडेही लक्ष द्यावं, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गाबरोबरच आपण इतर अनेक आव्हानांचा सामना करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.