व्यापारी समुदायाने आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी संपूर्ण योगदान द्यावं - पियुष गोयल


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यापारी समुदायाने आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी संपूर्ण योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. राष्ट्रीय व्यापारी दिनानिमित्त काल व्यापारी समुदायासोबत बोलताना ते म्हणाले की भारतात निर्मित वस्तुमाल लोकांनी खरेदी करावा यासाठी ग्राहकांमध्ये जागरुकता वाढवण्याचं काम व्यापारी समुदायानं केलं पाहिजे.

भारताशी मैत्रीपूर्ण संबंध न ठेवणाऱ्या देशांमधून निकृष्ट माल आयात करणाऱ्या व्यवसायिकांचं पितळ उघडं पाडण्याचंही काम व्यापारी करु शकतात याकडे गोयल यांनी लक्ष वेधलं. अगरबत्ती, क्रिडा साहित्य, टीवी, टेलिफोन आणि टायर्स यासारख्या देशात उत्पादित होऊ शकणाऱ्या अनेक आयाती वस्तूंवर सरकारनं यापूर्वीच निर्बंध लागू केले असल्याचं ते म्हणाले.

सुमारे १० लाख कोटी रुपये किंमतीची आयात देशांतर्गत निर्मित वस्तुमालातून भागवता येऊ शकते अशी माहिती गोयल यांनी दिली.