पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशाविरुद्ध युवा सेनेतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल


नवी दिल्‍ली : देशातल्या सर्व विद्यापीठांनी पदवी अभ्यासक्रमांच्या, अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घ्याव्यात यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं जारी केलेल्या आदेशाविरुद्ध युवा सेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा रद्द करण्याची परवानगी मिळावी, तसंच आपापल्या राज्यातल्या परिस्थितीनुसार परीक्षा घ्याव्यात किंवा घेऊ नयेत हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक राज्याला मिळावा, अशी मागणी या याचिकेत केली आहे.

युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी आज ही याचिका दाखल केली. एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, तर त्याचवेळी मोठ्या संख्येनं एकत्र येण्याच्या घटना टाळाव्यात अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेनंही केली आहे हे लक्षात घ्यायला हवं असं सरदेसाई यांनी म्हटलं आहे. 


केवळ महाराष्ट्राप्रमाणे इतर सात राज्यांनीही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, या परीक्षा रद्द व्हाव्यात अशी विद्यार्थ्यांचीही मागणी आहे. या मागणीच्या समर्थनार्थ युवा सेनेनं ऑनलाईन मोहीम राबवून, २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

परीक्षा रद्द कराव्यात या मागणीसाठी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी विद्यापीठ अनुदान आयोग आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्रही लिहीलं, मात्र त्याचा प्रतिसादच मिळालेला नाही, अशी माहितीही सरदेसाई यांनी दिली.