इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं. मुंबईत शहर काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, यांच्यासह काँग्रेस नेत्या आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, ज्येष्ठ नेते मधु चव्हाण आणि काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढी विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं.
पुण्यात आज अलका टॉकीज चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं. सातऱ्यात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. कोरोनामुळे जगणं कठीण झालेलं असताना, सतत होत असलेली इंधन दरवाढ म्हणजे सामान्य जनतेवरचा अन्याय असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
अमरावतीत इरविन चौकात धरणं आंदोलन झालं. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दरवाढीविरोधातले फलक झळकावत केंद्र सरकारचा निषेध केला. पालकमंत्री यशोमती ठाकूरही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जिल्हा काँग्रेस समितीचे जेष्ठ नेते रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन झालं.
परभणीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंधन दरवाढी विरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
नाशिकमधे काँग्रेस कमिटीच्या नाशिक शहर कार्यालयासमोर जमलेल्या पदाधिकाऱ्यानी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.
सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमधे आंदोलन झालं. गडचिरोली, चंद्रपूर, सांगली इथंही आंदोलन झालं.
लातूर जिल्हा आणि शहर काँग्रेसच्या वतीने झालेल्या आंदोलनात आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शक सायकलवरुन सहभागी झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळच्या प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करून इंधन दरवाढीचा निषेध केला. नागपूरमधे काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीविरोधात तर भाजपा कार्यकर्त्यांनी वाढीव वीजबिलांच्या निषेधात आंदोलन केलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.