माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईच्या भाजपा मुख्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं. चव्हाण यांनी कालच काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकी या दोन प्रमुख नेत्यांनंतर अशोक चव्हाण काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानं काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. अशोक चव्हाण यांच्याबरोबर माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने भाजप आणि महायुतीची शक्ती वाढली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाला विकसित करण्याच्या मार्गावर अग्रेसर असल्याने देशभरातील अनेक नेत्यांना मुख्य प्रवाहात काम करावं, असं वाटत असून ते भाजपमध्ये येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितलं. अशोक चव्हाण यांना राज्यसभा उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय नेतृत्व याबाबतचा निर्णय घेईल. तर अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये बिनशर्त प्रवेश केला. त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा केलेली नाही असं बावनकुळे म्हणाले.

भाजपच्या वाढीसाठी आणि निवडणुकीत अधिकाधिक जागा निवडून देण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. व्यक्तिगत निर्णय म्हणून पक्ष सोडल्याचं अशोक चव्हाण यांनी आज सांगितलं. भाजपा प्रवेशावेळी कोणतीही मागणी केलेली नाही आणि दिली ती जबाबदारी स्वीकारू असंही ते म्हणाले. काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराला किंवा सदस्याला भाजपामध्ये येण्यासाठी आग्रह केला नाही असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. 

मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी भाजपा मध्ये दाखल होतील. येत्या काही दिवसात हा आकडा स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. तर भाजपा ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून दबाव तंत्राचा वापर करून काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडत आहेत, असा आरोप काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे.  

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार
Image
राज्यातील विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाची हजेरी
Image
अर्जेंटिनाविरुद्ध हॉकीच्या चौथ्या सराव सामन्यात भारताचा विजय
Image