पिंपरी चिंचवड शहरात विकसित भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद

 

पुणे : केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेचा समारोप जुनी सांगवी येथील गजानन महाराज मंदिराजवळील व्यापारी केंद्र येथे करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केलेल्या आवाहनास शहरवासियांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून नागरिकांनी या यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेतला.

पिंपरी-चिंचवड शहरात २८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत ६४ विविध ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले. यात्रेत एकूण ३९ हजार १३४ नागरिकांनी सहभाग घेतला. २ हजार ६८२ नागरिकांनी आधार कार्ड नोंदणीचा लाभ घेतला. ९ हजार ६०७ जणांनी आरोग्य शिबीरास भेट देऊन आरोग्य सुविधांचा लाभ घेतला. ५ हजार ९१० नागरिकांनी आयुष्मान भारत कार्ड केंद्रास भेट देवून नोंदणी केली.

यात्रेदरम्यान २ हजार ४८७ नागरिकांनी उज्वला गॅस योजनेचा लाभ घेतला, तर पंतप्रधान स्वनिधी केंद्रास ३ हजार ४६४ नागरिकांनी भेट देऊन योजनेचा लाभ घेतला. १० हजार ९६५ नागरिकांनी आत्मनिर्भर भारतासाठी सामुहिक शपथ घेतली. शहरातील या मोहिमेत खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, आमदार उमा खापरे, आण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले.