स्त्रियांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी आपल्या सरकारनं सर्व प्रयत्न केल्याचा प्रधानमंत्र्यांचा दावा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्त्रियांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी आपल्या सरकारनं सर्व प्रयत्न केल्याचा दावा पंतप्रधानांनी काल केरळच्या थ्रिशूर इथं भाजपानं आयोजित केलेल्या विशाल महिला मेळाव्यात बोलताना केला. स्वातंत्र्यप्राप्तीपासून केरळवर राज्य करणाऱ्या डावी लोकशाही आघाडी आणि संयुक्त लोकशाही आघाडी या दोन्ही पक्षांनी स्त्रियांना अनेक मूलभूत सुविधा आणि हक्कांपासून वंचित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. संसद आणि राज्य विधिमंडळांमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या महिला आरक्षण विधेयकासंबंधी या दोन्ही आघाड्यांनी घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी टीकास्त्र सोडलं.

तत्पूर्वी,पंतप्रधानांनी लक्षद्वीप समूहातल्या एका बेटावर 1 हजार 1 शे 56 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा प्रारंभ आणि पायाभरणी केली. लक्षद्वीपच्या धारणाक्षम विकासासाठी सरकार पूर्णतः कटिबद्ध असल्याची ग्वाही या कार्यक्रमात त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर लक्षद्वीपला महत्त्वाचं स्थान मिळावं, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लक्षद्वीपला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या पाचपटींनी वाढली आहे, असं सांगून,परदेशातल्या समुद्रकिनाऱ्यांना भेटी देण्यासाठी जाणाऱ्यांनी आधी लक्षद्वीपला यावं,असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.