प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत आधार नोंदणी शिबिरांचे आयोजन करा - मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण

 

पुणे : प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत विविध लाभांसाठी लाभार्थ्यांची आधार नोंदणी आवश्यक असून त्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. या शिबिरांमध्ये आयुष्मान कार्ड नोंदणी, जनधन बँक खाते उघडणे यासाठीही नियोजन करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर, घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड आदी उपस्थित होते.

श्री.चव्हाण म्हणाले, स्वत:ची जागा नसलेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी शासकीय जागेबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे त्वरीत पाठवावा. वीज नसलेल्या वस्त्यांवर वीज देण्याबाबत आठवड्यात नियोजन सादर करावे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय बैठकीत योजनेअंतर्गत ११ बाबींचा आढावा घ्यावा.

महिला बचत गटातील सदस्य आणि युवकांना कौशल्याचे प्रशिक्षण देण्याबाबत तयारी करावी. वैद्यकीय उपकेंद्र नसलेल्या गावातील आदिवासी बांधवांच्या वस्त्यांवर फिरत्या वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी श्रीमती आखाडे आणि श्रीमती कडू यांनीदेखील योजनेच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले.

आंबेगाव तालुक्यात २६, भोर ३०, मावळ ९१, मुळशी २७, जुन्नर ८, खेड ३४ आणि वेल्हे तालुक्यात ११ गावे अशा एकूण २२६ गावात ही योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीला खेड, जुन्नर, आंबेगाव आणि भोरचे उपविभागीय अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, संबंधित तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.