परदेशी उच्च शिक्षण संस्थांना यु जी सी च्या पूर्व परवानगी शिवाय भारतात कोणताही अभ्यासक्रम राबवता येणार नाही

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशी उच्च शिक्षण संस्थांना यु जी सी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पूर्व परवानगी शिवाय भारतात कोणताही अभ्यासक्रम राबवता येणार नसल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे. आयोगाचे अध्यक्ष मामीदला जगदेश कुमार यांनी एका अधिसूचनेद्वारे समाजमाध्यमांवर ही माहिती दिली आहे. आयोगाच्या परवानगीशिवाय परदेशी उच्च शिक्षण संस्थांनी आखलेल्या संयुक्त अभ्यासक्रमाला मान्यता मिळणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनीही अशा संस्थांमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याआधी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांवर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. अनेक उच्च शिक्षण संस्था आणि महाविद्यालये परदेश-स्थित शैक्षणिक संस्थांच्या सहयोगाने असे अभ्यासक्रम राबवत असल्याचं आढळलं असून अशा सहयोगी संस्थांनी राबवलेले अभ्यासक्रम तसंच त्यांनी बहाल केलेल्या पदवीलाही मान्यता मिळणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.