इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) जनजागृती व प्रात्याक्षिक मोहिमेचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ

 

पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा (ईव्हीएम मशीन) वापर होणार असल्याने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत जनजागृती आणि प्रात्याक्षिक मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, २१४ कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे मतदान नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे, २१३ हडपसर विधानसभा मतदार संघाचे मतदान नोंदणी अधिकारी विवेक जाधव, सहायक नगर रचनाकार तथा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे पथक प्रमुख प्रतीक डोळे आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या पथकाकडून यंत्राविषयी माहिती जाणून घेतली. ते म्हणाले, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रात जनजागृती व प्रात्याक्षिके चांगल्याप्रकारे करावीत. नागरिकांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र कसे काम करते हे समजावून सांगण्यासोबत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र नव्हे आपल्या मताचे बुलेटप्रूफ कवच आहे, हे यंत्र कोणत्याही हस्तक्षेपापासून अलिप्त, विनापरवाना अनधिकृत वापर ओळखण्याच्या तंत्रज्ञानाने आणि सांकेतिक लिपीबद्धतेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याबाबत माहिती द्यावी.

ईव्हीएम स्वतःची कार्यक्षमता आणि स्थिती स्वतःच ओळखण्याच्या क्षमतेने सुसज्ज व रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून माहितीच्या आदानप्रदानाबाबतीत अक्षम आहेत याबाबत नागरिकांना माहिती द्यावी. नागरिकांचे नोदवहीत अभिप्राय घेवून त्यांच्या शंका व प्रश्नांचे निरसन करावे, असेही त्यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची जनजागृती व प्रात्याक्षिक मोहिम जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राअंतर्गत गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठ, मॉल इत्यादी ठिकाणी २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सूरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी ईव्हीएम यंत्राच्या प्रात्याक्षिकाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. देशमुख यांनी यावेळी केले.