सदर्न स्टार विजय रन 2023: ‘रन फॉर सोल्जर्स, रन विथ सोल्जर्स’

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) 53 व्या विजय दिवसाच्या स्मरणार्थ, लष्कराच्या दक्षिण  कमांड मुख्यालयाने 16 डिसेंबर रोजी पुणे रेसकोर्स येथे ‘सदर्न स्टार विजय दौड 2023’ चे आयोजन केले होते. या विजय दौडची संकल्पना होती ‘रन फॉर सोल्जर्स, रन विथ सोल्जर्स’ अर्थात ‘सैनिकांसाठी धावा, सैनिकांसोबत धावा’. 1971 च्या युद्धात आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या आपल्या शूर सैनिकांप्रति आदर व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ही दौड आयोजित करण्यात आली होती. 1971 च्या युद्धात सहभागी झालेले सैनिक आणि हुतात्म्यांच्या प्रति आपली एकनिष्ठता दाखवण्यासाठी या दौडमध्ये सर्वच स्तरातील सहभागींनी भाग घेतला.

याशिवाय, 53 व्या विजय दिवसाच्या स्मरणार्थ 53 तासांची दौडही आयोजित करण्यात आली होती, हा कार्यक्रम 14 डिसेंबर रोजी सकाळी 0300 वाजता सुरू झाला आणि 16 डिसेंबर 23 रोजी संपला. या दौड मधून खरोखरच सहनशीलतेचे एक उल्लेखनीय प्रदर्शन दिसून आले, जे या महत्त्वपूर्ण प्रसंगाच्या चिरस्थायी भावनेचे प्रतीक आहे.

पुण्यात आयोजित या विजय दौडला दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए.के. सिंग (एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम) यांनी हिरवा झेंडा दाखवला, आणि ते स्वत: सहभागींसोबत 5 किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत धावले. या कार्यक्रमा अंतर्गत मुंबई, चेन्नई, सिकंदराबाद, जोधपूर, भोपाळ इत्यादी शहराबरोबरच भारतातील 10 राज्यांमधील 19 ठिकाणी एकाचवेळी  दौडचे आयोजन करण्यात आले होते. विजयी दिवसाच्या स्मरणार्थ आयोजित या दौड मध्ये समाजातील सर्व स्तरातून सुमारे 50,000 सहभागिनी भाग घेतला होता.

आपल्या सशस्त्र दलांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करणार्‍या लष्करी बँडच्या मंत्रमुग्ध करणार्‍या कवायतींचे प्रदर्शन उपस्थितांना पाहायला मिळाले. यावेळी आपल्या कुशल सैनिकांनी त्यांच्या दमदार गटका प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, या प्रात्यक्षिकांमधून सहभागी झालेल्या लोकांमध्ये स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच सैनिकांचे उत्साही कलाप्रकाराचे प्रदर्शन वातावरणाला अधिक उत्तेजित करत होते. याशिवाय,  प्रतिभावान जॅझ बँड यांचा डीजे संगीत कार्यक्रम आणि लेझिम प्रात्यक्षिकांनी संपूर्ण दिवसभरासाठी मंत्रमुग्ध करणारे वातावरण निर्माण केले होते.