जम्मू काश्मीर मधील रामबन पूलाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण

 

1.08 किलोमीटर लांबीच्या चौपदरी मार्गाची पूर्णता ही लक्षणीय कामगिरी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

प्रकल्पासाठी 328 कोटी रुपये खर्च आला असून तो राष्ट्रीय महामार्ग-44 च्या उधमपूर-रामबन विभागात आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जम्मू काश्मीर मधील रामबन पूलाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून 1.08 किलोमीटर लांबीच्या चौपदरी मार्गाची पूर्णता ही लक्षणीय कामगिरी असल्याचे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. समाजमाध्यमांवरील संदेश मालिकेत त्यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पासाठी 328 कोटी रुपये खर्च आला असून तो राष्ट्रीय महामार्ग-44 च्या उधमपूर-रामबन विभागात आहे.

 

या असामान्य उड्डाणपूलात कॉंक्रीट आणि पोलाद यांच्या तुळई अर्थात गर्डर्सचा वापर केला आहे. हा पूल पूर्ण झाल्याने रामबन बाजार भागातली वाहतूककोंडी लक्षणीयरित्या कमी होईल तसेच वाहनांच्या वाहतुकीचा प्रवाह सहज सुलभ होईल असे ते म्हणाले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही जम्मू आणि काश्मीरला एक उत्कृष्ट महामार्ग पायाभूत सुविधा देण्यासाठी समर्पित आहोत असे गडकरी म्हणाले. ऐतिहासिक कामगिरी केवळ प्रादेशिक आर्थिक समृद्धीलाच चालना देत नाही तर दर्जेदार पर्यटनाचे नंदनवन म्हणूनही त्याचे आकर्षण वाढवते, असेही त्यांनी सांगितले.