सिल्क्यारा बोगदा दुर्घटनेतल्या श्रमिकांशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तराखंडमधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांची तब्बल १७ दिवसांनी काल सुटका झाल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यातले ४१ कामगार गेल्या १२ तारखेपासून बोगद्यात अडकले होते. या बचावकार्यात केंद्र तसंच राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी युद्धपातळीवर काम केलं आणि कामगारांच्या सुटकेसाठीचे शक्य ते सर्व उपाय केले.

कामगारांना अन्न, पाणी, औषधं आणि ऑक्सीजन अशा सर्व सुविधा सहा इंचाच्या पाइपलाईनद्वारे पुरवण्यात आल्या. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री तसंच केंद्रीय मंत्री आणि अन्य मान्यवरांनी या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अडकलेले कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनी दाखवलेलं धैर्य तसंच संयमाची प्रशंसा केली आहे. बचावकार्य यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल यामध्ये सहभागी सर्व यंत्रणांचं त्यांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज या कामगारांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या तब्येतीची आस्थेनं चौकशी केली.