निसर्गाची हानी होणार नाही असे पदार्थ निवडण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हवामान बदलाच्या समस्येत भर घालणाऱ्या अन्नपदार्थांपासून दूर जाण्यासाठी जाणीवपूर्वक निर्णय घेण्याची गरज असून, लोकांनी निसर्गाची हानी होणार नाही असे पदार्थ निवडणे गरजेचं आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं. भारत मंडपम इथं आयोजित करण्यात आलेल्या ‘विश्व भारतीय खाद्य महोत्सवाचा काल त्यांच्या हस्ते समारोप झाला. या महोत्सवात ८० हून अधिक देशांतल्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. समृद्ध भारतीय खाद्यसंस्कृतीची जगाला ओळख करून देण्यासाठी हा महोत्सव अत्यंत महत्त्वाचा असून, या क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना देशांतर्गत आणि जागतिक पातळीवरील उद्योगांशी संबंध दृढ करण्यासाठी आणि भारताला शेती आणि खाद्यपदार्थांचे केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे, असंही त्या म्हणाल्या. उपासमारी वाढण्याचं कारण उत्पादनाची कमतरता नाही, तर वितरणाचा अभाव हे आहे, असंही त्यांनी नमूद केलं.